योग्य स्वरूपात व योग्य प्रमाणात वंगण अर्थात स्निग्धता, ही शरीराची महत्त्वाची आवश्यकता असते. शरीरालाच नाही, तर निर्जीव यंत्राला, वाहनालाही नुसती वीज वा पेट्रोल, डिझेल पुरत नाही, बरोबरीने वंगण लागतेच. शरीरासाठी सर्वोत्तम वंगण म्हणजे साजूक, आयुर्वेदीय पद्धतीने बनविलेले तूप.
वेदकाळापासून तुपाला खूप महत्त्वाचे समजले जाते. यज्ञ-याग, पूजा-अर्चा वगैरेंसाठी तूप लागतेच; पण औषध म्हणून, आहारद्रव्य म्हणूनही ते सर्वश्रेष्ठ असते. तूप हा स्निग्धतेचा सर्वोत्तम स्रोत असल्याने पंचकर्मातही तुपाला महत्त्वाचे स्थान असते.
तूप बनविण्याची पद्धत
दह्याचे ताक बनविताना वेगळे झालेले लोणी थंड पाण्याने 4-5 वेळा स्वच्छ धुवून घ्यावे आणि मंद आचेवर कढवावे. पाण्याचा अंश नाहीसा झाला, की अग्नीवरून उतरवून पातळ सुती कपड्यातून गाळून संथ ठिकाणी गार होऊ द्यावे म्हणजे कणीदार, सुगंधी तूप तयार होते. कणीदार तूप आवश्यकतेनुसार लहान भांड्यात काढून घेऊन वापरावे. तूप पातळ करायचे असले, तर थोडेसे तूप वेगळ्या भांड्यात घेऊन ते भांडे गरम पाण्यात ठेवावे. एकदा तयार झालेल्या तुपाला पुन्हा प्रत्यक्ष अग्नीच्या संपर्कात आणणे चांगले नसते.
स्नेहानामुत्तमं शीतं वयसः स्थापनं परम् ।
सहस्रवीर्यं विधिभिर्घृतं कर्मसहस्रकृत् । ...वाग्भट सूत्रस्थान
तूप सर्व स्नेहांमध्ये उत्तम होय. तूप वीर्याने थंड असून वय उतरू न देणारे; म्हणजे वय वाढले तरी म्हातारपणाचा त्रास होऊ न देणारे असते. योग्य पद्धतीने, योग्य संस्कार करून तूप तयार केले, तर त्याचे वीर्य सहस्रपटींनी वाढते आणि ते सहस्रावधी कार्ये करण्यास समर्थ असते.
सर्व स्निग्ध पदार्थांमध्ये जसे गाईचे दूध श्रेष्ठ, तसेच सर्व तुपांमध्ये गाईचे तूप उत्तम असते. त्या खालोखाल म्हशीचे तूप चांगले. मात्र तूप गाईचे असो वा म्हशीचे, ते योग्य पद्धतीने बनविलेले असणे महत्त्वाचे.
आयुर्वेदाच्या ग्रंथात गाय, म्हैस, बकरी, मेंढी, हत्तीण, उंटीण वगैरे प्राण्यांच्या तुपाचे गुणधर्म दिलेले आहेत. आपण सहज बनविता येणाऱ्या गाय, म्हैस व बकरीच्या तुपाबद्दल माहिती करून घेऊ.
गाईच्या दुधाचे तूप
गोघृतं तु रसे पाके स्वादु शीतं गुरु स्मृतम् ।
अग्निदीप्तिकरं स्निग्धं सुगन्धि च रसायनम् ।।
रुच्यं नेत्र्यं कान्तिदं च वृष्यं मेधाकरं मतम् ।
लावण्यतेजोबलकृत् वयःस्थापनकारकम् ।।
बुद्धिप्रदं शुक्रलं च स्वर्यं हृद्यं नृणां हितम् ।
बाले वृद्धे क्षतक्षीणे चाग्निदग्धव्रणे तथा ।।
शस्त्रक्षतं वातपित्तं कफभ्रमविषाञ्जयेत् ।
त्रिदोषं नाशयेत्येवम् ऋषिभिः परिकीर्तितम् ।। ...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर
गुण - स्निग्ध, गुरू, सुगंधी
वीर्य - शीत
विपाक - मधुर
दोष - वातपित्तशामक, योग्य प्रमाणात घेतल्यास कफाचे संतुलन करणारे
गाईचे तूप अग्नीस प्रदीप्त करते, रसायन म्हणून काम करते, रुची वाढवते, डोळ्यांसाठी हितकर असते, कांती उजळवते, शुक्रधातूला वाढवते, आकलनशक्ती व बुद्धी वाढवते. एकंदर सतेजता देते, लावण्य, शक्ती वाढवते. तुपाच्या नियमित सेवनाने म्हातारपणाचा त्रास होत नाही. तुपामुळे आवाज सुधारतो, हृदयाला ताकद मिळते. लहान मुले, वृद्ध, क्षीण शक्ती यांना विशेषत्वाने हितकर असते. भाजल्यावर, जखम झाल्यावर, विषबाधा झाल्यावरही तूप उपयोगी असते.
म्हशीच्या दुधाचे तूप
घृतं चोक्तं महिष्यास्तु सौख्यदं वर्णकारकम् ।
हृद्यं कान्तिकरं रुच्यं कफकृत् स्वादु शीतलम् ।।
विष्टम्भकारकं बल्यं धृतिदं च गुरु स्मृतम् ।
अर्शः संग्रहणीं वातं रक्तपित्तं भ्रमं तथा ।।
पित्तं च नाशयेत्येवम् ऋषिभिः परिकीर्तितम् । ...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर
गुण - गुरू
वीर्य - शीत
ीविपाक - मधुर
दोष - वात-पित्तशामक, कफकर
म्हशीच्या दुधापासून योग्य पद्धतीने तयार केलेले तूप सुखदायक असते, वर्ण उजळवते, रुचकर असते, हृदयाला हितकर असते. अति प्रमाणात घेतल्यास कफदोष वाढवते व मलावष्टंभ करते; मात्र योग्य प्रमाणात व योग्य प्रकाराने सेवन केल्यास ताकद वाढवते, धैर्यशक्ती वाढवते. याच्या योगे मूळव्याध, ग्रहणी, रक्तपित्त, चक्कर, वात व पित्त यांचा नाश होतो.
बकरीच्या दुधाचे तूप
अजाघृतं च चक्षुष्यं दीपनं बलवर्धनम् ।
वृष्यं पाके कटु प्रोक्तं कासश्वासक्षयापहम् ।।
नाशनं परमं प्रोक्तं कफार्शोराजयक्ष्मणाम् । ...निघण्टु रत्नाकर
बकरीच्या दुधापासून विधिवत तयार केलेले तूप डोळ्यांना हितकर असते, अग्नीस प्रदीप्त करते, बल वाढवते, शुक्रधातूसाठी हितकर असते, विपाकाने तिखट असल्याने बकरीचे तूप विशेषत्वाने कफशामक असते. खोकला, दमा, क्षय, कफज मूळव्याध वगैरे रोगांत हितकर असते.
संदर्भ : दैनिक सकाळ
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०
अन्नयोग : तूप
Bookmark this post:blogger tutorials
Social Bookmarking Blogger Widget | I'm reading: अन्नयोग : तूप ~ |
Posted by Admin at ११:५३ PM 0 comments
Labels:
आरोग्य
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०
नापास मुलाने सुरू केला वेब रेडिओ
सकाळ वृत्तसेवा
शर्मिला कलगुटकर
संदर्भ: दैनिक सकाळ
मुंबई - मुलांनी मुलांसाठी सुरू केलेला पहिला वेब रेडिओ उद्यापासून रुईया महाविद्यालयामध्ये सुरू होत आहे. त्याचं नाव आहे, "रूईया कॉलेज रेडिओ डॉट कॉम'. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हा रेडिओ ऐकता येणार आहे. पुस्तकांपासून स्पोर्टस्पर्यंत, पिक्चरपासून पॉकेटमनीपर्यंत नानाविध गोष्टींचा खजिना यामध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला नानाविध माहितीचा आणि गोष्टींचा खजिना खुला करणारा हा "ई रेडिओ' कुणी बनवला आहे, माहित्येय? नापास मुलगा असा शिक्का बसलेल्या शंतनू जोशीने!
अगदी लहानपणापासून शंतनूला रेडिओचं प्रचंड आकर्षण. त्यातून ऐकू येणारा आवाज, त्यातले चढउतार, संवादाची फेक, त्यामागील तंत्रज्ञानाची किमया या साऱ्यांचं त्याला अप्रूप वाटायचं. त्यातूनच तो कॉलनीतल्या आजोबांपासून ते छोट्या दोस्तापर्यंत अनेकांचे आवाज रेकॉर्ड करायचा आणि त्यातील वैविध्य टिपायचा. दहावीच्या सुटीतही त्याने त्याच्या याच आवडीतून आपल्या कॉलनीतल्या कंपूसाठी एक रेडिओ सुरू केला, त्याचं नाव होतं शान रेडिओ! शंतनूचा हा रेडिओ अल्पावधीतच हिट झाला, प्रत्येक मजल्यावर हा शान रेडिओ
या हौसेने ऐकला जायचा. याच क्षेत्रात करिअर करायचं म्हणून शंतनूने बारावीनंतर रूईया महाविद्यालयात बीएमएमला प्रवेशही घेतला. या क्षेत्रात पुढे जायचे म्हणजे गाठीशी अनुभवही हवाच, म्हणूनही तो डबिंगपासून आरजेपर्यंत अनेक क्षेत्रांत स्वतःला तपासून पाहत होता. ध्वनीक्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि जगात या विषयावर होणाऱ्या संशोधनाचे अपडेट ठेवणारा शंतनू थिअरी परीक्षेत चक्क नापास झाला! त्याच्यावर "नापास मुलगा' असा शिक्का बसला.
या अपयशाने तो हिरमुसला खरा, पण त्याने उमेद गमावली नाही. अभ्यास महत्त्वाचा म्हणून विविध क्षेत्रांमध्ये त्याने स्वतःचा शोध घेणं थांबवलं नाही, उलट पाठ्यपुस्तकं जे ज्ञान तुम्हाला देतात ते तुम्ही विविध क्षेत्रांत "अप्लाय' करीत राहायला हवं, यावर शंतनूचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच या अपयशाकडे त्याने संधी म्हणून पाहिलं. वेळेचं गणित नीट आखलं. अनेकांना "उपद्व्याप' वाटणाऱ्या रेडिओजगतातील अनेक गोष्टी तो अभ्यास सांभाळून नेटाने करू लागला. आकाशवाणीवर त्याने अनेक कार्यक्रम केलेच, पण त्याचसोबत अनिवासी भारतीयांसाठी अमेरिकेने सुरू केलेल्या एका रेडिओचा आरजे म्हणूनही काम केलं, कार्टून फिल्मस्साठी डबिंग केलं, संगीतदिग्दर्शनाचं प्रशिक्षणही घेतलं, त्याची ही धडपड पाहून त्याचे पालक आणि लीना केदारेंसारख्या प्राध्यापिका त्याच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या.
आपल्या दोस्तामधल्या क्रिएटीव्हीटीला पूर्ण वाव देण्यासाठी दोस्तमंडळींनाच सोबत घेऊन सुरू केलेला हा रूईयाचा वेब रेडिओ अमीय सयानी यांच्या हस्ते "ट्युन इन' होणार आहे. त्याच्या रेडिओचा हा प्रयोग केवळ मुंबईतच नाही तर देशविदेशांतील अनेक रेडिओ चॅनेल्सनाही खूप अनोखा वाटतोय. परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास असा गंड अनेक मुलांच्या मनात असतो. त्यातूनच नैराश्य येते, कोवळी मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मार्कांच्या नाही तर गुणवत्तेच्या मागे धावला तर यश तुमच्या मागे आपोआप येईल, हेच यशाचं खरं गमक शंतनूने जाणलं आहे, तेच तो आपल्या मित्रांनाही सांगतोय, "थ्री इडियट्स' मधल्या रांजोसारखाच!
संदर्भ: दैनिक सकाळ
Bookmark this post:blogger tutorials
Social Bookmarking Blogger Widget | I'm reading: नापास मुलाने सुरू केला वेब रेडिओ ~ |
Posted by Admin at १:४२ PM 0 comments
Labels:
इंटरनेट घडामोडी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)