शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

नापास मुलाने सुरू केला वेब रेडिओ

सकाळ वृत्तसेवा

शर्मिला कलगुटकर
मुंबई - मुलांनी मुलांसाठी सुरू केलेला पहिला वेब रेडिओ उद्यापासून रुईया महाविद्यालयामध्ये सुरू होत आहे. त्याचं नाव आहे, "रूईया कॉलेज रेडिओ डॉट कॉम'. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हा रेडिओ ऐकता येणार आहे. पुस्तकांपासून स्पोर्टस्‌पर्यंत, पिक्‍चरपासून पॉकेटमनीपर्यंत नानाविध गोष्टींचा खजिना यामध्ये आहे. प्रत्येक आठवड्याला नानाविध माहितीचा आणि गोष्टींचा खजिना खुला करणारा हा "ई रेडिओ' कुणी बनवला आहे, माहित्येय? नापास मुलगा असा शिक्का बसलेल्या शंतनू जोशीने!

अगदी लहानपणापासून शंतनूला रेडिओचं प्रचंड आकर्षण. त्यातून ऐकू येणारा आवाज, त्यातले चढउतार, संवादाची फेक, त्यामागील तंत्रज्ञानाची किमया या साऱ्यांचं त्याला अप्रूप वाटायचं. त्यातूनच तो कॉलनीतल्या आजोबांपासून ते छोट्या दोस्तापर्यंत अनेकांचे आवाज रेकॉर्ड करायचा आणि त्यातील वैविध्य टिपायचा. दहावीच्या सुटीतही त्याने त्याच्या याच आवडीतून आपल्या कॉलनीतल्या कंपूसाठी एक रेडिओ सुरू केला, त्याचं नाव होतं शान रेडिओ! शंतनूचा हा रेडिओ अल्पावधीतच हिट झाला, प्रत्येक मजल्यावर हा शान रेडिओ
या हौसेने ऐकला जायचा. याच क्षेत्रात करिअर करायचं म्हणून शंतनूने बारावीनंतर रूईया महाविद्यालयात बीएमएमला प्रवेशही घेतला. या क्षेत्रात पुढे जायचे म्हणजे गाठीशी अनुभवही हवाच, म्हणूनही तो डबिंगपासून आरजेपर्यंत अनेक क्षेत्रांत स्वतःला तपासून पाहत होता. ध्वनीक्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि जगात या विषयावर होणाऱ्या संशोधनाचे अपडेट ठेवणारा शंतनू थिअरी परीक्षेत चक्क नापास झाला! त्याच्यावर "नापास मुलगा' असा शिक्का बसला.

या अपयशाने तो हिरमुसला खरा, पण त्याने उमेद गमावली नाही. अभ्यास महत्त्वाचा म्हणून विविध क्षेत्रांमध्ये त्याने स्वतःचा शोध घेणं थांबवलं नाही, उलट पाठ्यपुस्तकं जे ज्ञान तुम्हाला देतात ते तुम्ही विविध क्षेत्रांत "अप्लाय' करीत राहायला हवं, यावर शंतनूचा पूर्ण विश्‍वास आहे. म्हणूनच या अपयशाकडे त्याने संधी म्हणून पाहिलं. वेळेचं गणित नीट आखलं. अनेकांना "उपद्‌व्याप' वाटणाऱ्या रेडिओजगतातील अनेक गोष्टी तो अभ्यास सांभाळून नेटाने करू लागला. आकाशवाणीवर त्याने अनेक कार्यक्रम केलेच, पण त्याचसोबत अनिवासी भारतीयांसाठी अमेरिकेने सुरू केलेल्या एका रेडिओचा आरजे म्हणूनही काम केलं, कार्टून फिल्मस्‌साठी डबिंग केलं, संगीतदिग्दर्शनाचं प्रशिक्षणही घेतलं, त्याची ही धडपड पाहून त्याचे पालक आणि लीना केदारेंसारख्या प्राध्यापिका त्याच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या.

आपल्या दोस्तामधल्या क्रिएटीव्हीटीला पूर्ण वाव देण्यासाठी दोस्तमंडळींनाच सोबत घेऊन सुरू केलेला हा रूईयाचा वेब रेडिओ अमीय सयानी यांच्या हस्ते "ट्युन इन' होणार आहे. त्याच्या रेडिओचा हा प्रयोग केवळ मुंबईतच नाही तर देशविदेशांतील अनेक रेडिओ चॅनेल्सनाही खूप अनोखा वाटतोय. परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास असा गंड अनेक मुलांच्या मनात असतो. त्यातूनच नैराश्‍य येते, कोवळी मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मार्कांच्या नाही तर गुणवत्तेच्या मागे धावला तर यश तुमच्या मागे आपोआप येईल, हेच यशाचं खरं गमक शंतनूने जाणलं आहे, तेच तो आपल्या मित्रांनाही सांगतोय, "थ्री इडियट्‌स' मधल्या रांजोसारखाच!

संदर्भ: दैनिक सकाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा