मंगळवार, १३ एप्रिल, २०१०
अन्नयोग : मध
मधाला संस्कृतमध्ये 'मधु' म्हणतात. नावावरूनच त्याची मधुरता लक्षात येते. चरकसंहितेमध्ये मधाचे चार प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतसंहिता, निघण्टु रत्नाकर वगैरे ग्रंथांत तर आठ प्रकार सांगितले आहेत.
ऊस, गूळ, साखर वगैरे गोड पदार्थांची माहिती आपण पाहिली. आज आपण नैसर्गिक मधुर पदार्थांची माहिती घेणार आहोत. मधाला संस्कृतमध्ये "मधु' म्हणतात. नावावरूनच त्याची मधुरता लक्षात येते. चरकसंहितेमध्ये मधाचे चार प्रकार सांगितले आहेत. सुश्रुतसंहिता, निघण्टु रत्नाकर वगैरे ग्रंथांत तर आठ प्रकार सांगितले आहेत. खऱ्या, शुद्ध मधाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत-
मधु शीतं लघु स्वादु रुक्षं स्वर्यं च ग्राहकम् ।
चक्षुष्यं लेखनं चाग्निदीपकं व्रणशोधकम् ।।
नाडीशुद्धिकरं सूक्ष्मं रोपणं मृदु वर्णकृत् ।
मेधाकरं च विशदं वृष्यं रुचिकरं मतम् ।।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर, किंचित तुरट
* गुण - रूक्ष, लघू म्हणजे पचण्यास हलका, मृदू म्हणजे मार्दवता देणारा, सूक्ष्म म्हणजे लहानातल्या लहान जागेत पोचू शकणारा, विशद म्हणजे स्वच्छ करणारा
* वीर्य - शीत
* दोषघ्नता - कफनाशक, किंचित वातकर
* मध आवाजासाठी हितकर असतो, डोळ्यांसाठी चांगला असतो, शरीरात साठलेले अवाजवी दोष व धातू यांना खरवडून काढणारा असतो, अग्नीस प्रदीप्त करतो, जखम शुद्ध करतो, तसेच भरून आणण्यासही मदत करतो. शरीरातील सर्व नाड्यांची, स्रोतसांची शुद्धी करतो, वर्ण उजळवतो, मेधा म्हणजे आकलनशक्ती सुधारतो, शुक्रधातूचे पोषण करतो, रुचकर असतो, खाल्ल्यावर मनाला आनंद देतो.
* मध अनेक रोगांमध्ये उपयुक्त असतो. त्वचारोग, मूळव्याध, खोकला, पित्तदोष, रक्तदोष, कफदोष, प्रमेह, जंत, मदरोग, ग्लानी, तृष्णा (तहान न शमणे), उलटी, जुलाब, दाह, क्षयरोग, मेदरोग, उचकी, पोट फुगणे, विषबाधा, मलावष्टंभ वगैरे रोगांमध्ये मध औषधाप्रमाणे उपयोगी असतो. तसेच मुख्य औषधाचे अनुपान म्हणून वापरण्यासाठी उत्तम असतो. मधाचा सर्वात मोठा गुण म्हणजे मध योगवाही असतो. ज्या कोणत्या औषधाबरोबर मध मिसळला जाईल त्याचे गुण वाढवतो आणि शरीरात झपाट्याने पसरतो. पाण्याच्या पृष्ठभागावर टाकलेला तेलाचा थेंब जसा चहुबाजूंना वेगाने पसरतो आणि संपूर्ण पृष्ठभाग व्यापून टाकतो, तसाच मध शरीरात गेला की सर्वत्र पसरतो. म्हणूनच मध हे उत्तम अनुपान आहे. शिवाय चवीचा विचार करताही मधाबरोबर औषध घेणे सोपे जाते. विशेषतः लहान मुलांना मधासह औषध देणे खूपच सोपे असते.
* मध गरम आहे असा समज सहसा दिसतो, पण आयुर्वेदात मध शीत आहे, असे स्पष्ट सांगितले आहे. मध लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्व जण नियमितपणे सेवन करू शकतात. कोणतीही प्रकृती असली, कोणताही ऋतू असला तरी मध खायला हरकत नसते. फक्त मध अल्प प्रमाणातच खायचा असतो.
गुरुरुक्षकषायत्वात् शैत्याच्चाल्पं हितं मधु ।...चरक सूत्रस्थान
* मध गुणांनी कोरडा, चवीने तुरट, वीर्याने शीत आणि अधिक प्रमाणात सेवन केल्यास जड होत असल्याने अल्प प्रमाणात घेणेच हितकर असते. चवीला रुचकर आहे म्हणून वाटीभर मध एकदम खाणे अयोग्य होय. सर्वसाधारणपणे 2-3 चमचे मध दिवसभरात सेवन करण्यास हरकत नसते. मध गरम नसला तरी मधाला उष्णता चालत नाही.
हन्यात् मधूष्णमुष्णार्तमथवा सविषान्वयात् ।...चरक सूत्रस्थान
* गरम केलेला मध किंवा गरम पदार्थात मिसळलेला मध शरीरात विषदोष तयार करू शकतो, म्हणून मध सेवन करताना त्याचा उष्णतेशी संबंध येणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. हल्ली बऱ्याच पाककृतींमध्ये मध वापरलेला आढळतो आणि बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होताना दिसते. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध टाकून घेण्याची पद्धत रूढ झालेली दिसते, पण अगदी कढत पाण्यात मध टाकणे अयोग्य होय. कोमट पाण्यात मध टाकून घ्यायला हरकत नाही.
* थोडक्यात, चांगला शुद्ध मध योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे सेवन केला तर त्यामुळे आरोग्य चांगले राहायला मदत मिळेल. तान्ह्या बाळापासून कोणीही मध घेणे उत्तम होय.
* तोंडात चिकटपणा जाणवत आल्यास आल्याचा रस व मध मिसळून तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटण्याने लगेच बरे वाटते.
* खोकल्याची ढास थांबत नसेल, उचकी थांबत नसेल तेव्हा या प्रकारचे चाटण चाटण्याचा उपयोग होतो.
* पोटात वायू धरला असेल, अस्वस्थ होत असेल, पोट दुखत असेल, मळमळत असेल तर आल्या-लिंबाच्या रसात मध मिसळून चाटण्याचा खूप पटकन व चांगला उपयोग होतो.
* भाजले असता, चटका लागला असता पटकन मध व तुपाचे मिश्रण वरून लावल्याने आग कमी होते, तसेच फोड येत नाही.
* आजकाल बऱ्याचदा साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात मधमाश्यांचे जुने पोळे बुडवून तो खरा मध म्हणून विकण्याच्या घटना घडतात, त्यापासून सावध राहावे. तसेच साखर-गुळाच्या पाकाला मधासारखा रंग व कृत्रिम वास देऊनही तो मध नावाखाली विकला जातो. त्यापासूनही सावध राहावे.
* मध शुद्ध आहे का हे तपासण्यासाठी एक पद्धत म्हणजे चमचाभर मध तोंडात घेतला व खाल्ला तर तोंडात थोडाही चिकटा जाणवता कामा नये. उलट तोंड स्वच्छ झाल्यासारखे जाणवायला हवे. याउलट साखर-गुळाच्या पाकापासून तयार केलेला मध खाल्ल्यास तोंडात चिकटपणा जाणवतो.
संदर्भ : दैनिक सकाळ
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
Bookmark this post:blogger tutorials
Social Bookmarking Blogger Widget | I'm reading: अन्नयोग : मध ~ |
Posted by Admin at ११:४१ PM
Labels:
आरोग्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा