शनिवार, २० मार्च, २०१०

अन्नयोग : पनीर, चीज, चक्का


दूध हे सर्वोत्तम असते. दुधाला काहीही पर्याय असू शकत नाही, अगदी दुधापासून केलेले पदार्थही.

दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात; पण संस्कारांनुसार या सर्व पदार्थांचे गुण वेगवेगळे असतात. बऱ्याचदा दुधाचा पर्याय म्हणून दुधापासून केलेले पदार्थ खाल्ले जातात; परंतु दूध हे सर्वोत्तम असते. दुधाला काहीही पर्याय असू शकत नाही. आज आपण पनीर, चीज वगैरे पदार्थांच्या गुणदोषांची माहिती करून घेणार आहोत.

पनीर
"पनीर' हा पदार्थ प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला दिसतो. सध्याही भाजी, भजी वगैरे बनविण्यासाठी पनीर मोठ्या प्रमाणावर वापरला जाते.
क्षीरकूर्चिकापिण्डः कूर्चिकीभूतक्षीरस्य घनभागः ।
...सुश्रुत सूत्रस्थान
दुधात आंबट घातल्यानंतर दूध फाटते. यातील घट्ट भागातील पाणी काढून टाकले की पनीर तयार होते.

तद्‌गुणाः, गुरुः कफवर्धनः वातघ्नः
पुंस्त्वनिद्राप्रदः तर्पणो बृंहणश्‍च ।...सुश्रुत सूत्रस्थान
* गुण - गुरू म्हणजे पचायला जड
* दोष - वातघ्न पण कफदोषवर्धक
* पनीर चविष्ट असते; पण पचायला कठीण असते. कफदोष वाढविणारे असल्याने झोप शांत येण्यास मदत करते. तृप्ती देते, योग्य प्रमाणात खाल्ल्यास पौरुषत्व वाढवते. शरीराचे पोषण करते.
* ज्यांना भूक चांगली लागते, जे नियमित व्यायाम करतात, ज्यांचे काम मेहनतीचे असते त्यांच्यासाठी पनीर योग्य असते. बैठे काम करणाऱ्यांनी, पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांनी पनीर न खाणेच चांगले.
* ज्यांना झोप येत नाही, त्यांनी रात्री झोपताना दोन-तीन चमचे पनीर व साखर यांचे मिश्रण नीट चावून खाण्याचा उपयोग होतो. मात्र सर्दी, खोकला वगैरे त्रास असल्यास, वजन जास्ती असल्यास किंवा अंगावर सूज येत असल्यास रात्री पनीर खाणे टाळावे.
* वजन वाढविण्याची इच्छा असणाऱ्यांनी पचन व्यवस्थित होते आहे याकडे लक्ष ठेवून आहारात पनीरचा समावेश करता येतो.
* लहान मुलांना फारसे पनीर न देणेच चांगले, विशेषतः ज्या वयात मुलांना वारंवार सर्दी-खोकला-ताप वगैरे येण्याची प्रवृत्ती असते, त्या वयात पनीर टाळणेच श्रेयस्कर असते.

चीज* चीज पनीरपेक्षाही पचायला जड असते. दुधाला विरजण लावले की त्यापासून जे दही तयार होते, त्यात पाणी वाहते. हे पाणी दूर करून, विशिष्ट विरजण घालून आंबविण्याच्या क्रियेने चीज बनविलेले असते. चीज वास्तविक पाश्‍चिमात्य म्हणजे थंड देशातील पदार्थ आहे. हवामान जितके थंड, तितका पाचकाग्नी तीव्र होत असल्याने थंड प्रदेशात चीज खाल्ले तरी ते पचू शकते. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मात्र चीज सांभाळून खावे लागते. विशेषतः लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये चीजचे मोठे आकर्षण दिसते; मात्र पचनाचा विचार न करता केवळ रुचीमुळे चीज खाण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. दूध आवडत नाही म्हणून चीज खाणारी अनेक मुले असतात. पण दूध व चीज यांच्यात खूप मोठा फरक आहे.

* चीज शक्‍यतो दिवसा खावे; रात्री चीज खाण्याने स्थूलता वाढू शकते, अपचनाचा त्रास होऊ शकतो. चीज हे रुचीपुरते खावे. एका वेळी खूप जास्ती चीज न खाणेच चांगले. वारंवार सर्दी होणाऱ्यांनी, अंगावर सूज येणे, स्थूलता, हृद्रोग, मधुमेह वगैरे विकारांत चीज टाळणेच चांगले.

चक्का
सुती कापडात दही बांधून ठेवले की दह्यातील पाणी निघून जाते व चक्का तयार होतो.
वातघ्नं कफकृत्‌ स्निग्धं बृंहणं नातिपित्तकृत्‌ ।
कुर्यात्‌ भक्‍ताभिलाषं च दधि यत्‌ सुपरिस्रुतम्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान

* गुण - स्निग्ध
* दोष - वातशामक पण कफदोषवर्धक
* चक्का योग्य प्रमाणात सेवन केला असता पित्त वाढवत नाही. चक्का रुचकर असतो, शरीरपोषक असतो. नुसता चक्का सहसा खाल्ला जात नाही, तर चक्‍क्‍यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे चक्‍क्‍यापासून विशेष तयार केले जाते ते म्हणजे श्रीखंड. अर्थात आयुर्वेदात श्रीखंड बनविण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलेले आहे. केशर, सुंठ वगैरे द्रव्ये टाकून श्रीखंड बनवण्यामागे चक्का पचावा व चक्‍क्‍याचे गुण मिळावेत असा उद्देश असतो. कफप्रकृतीच्या व्यक्‍तींनी, कफदोष वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी चक्का न खाणे चांगले.

संदर्भ : दैनिक सकाळ

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405


डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा